वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यात दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वेळी झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
तालुक्यात बुधवार व गुरुवार असे दोन दिवस सगळीकडे हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे वातावरणातील उष्मा कमी होऊन नागरिकांना उकड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तरी शेतातील काढणीला आलेल्या कांदा, गहू, बाजरी, मका, हरबरा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने तालुक्यातील बोरसर शिवारातील शेत गट क्रमांक १५२ मधील नाना भागीनाथ शेवाळे यांच्या तीन एकर क्षेत्रातील मका पीकाला अवकाळीचाफटका बसल्याने नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
याच शिवारातील गट क्रमांक ३७ मधील यांच्या एक एकर क्षेत्रातील बाजरीचे पीक वादळी पावसाने आडवे झाले. गट क्रमांक ३४ मधील दत्तात्रय आनंदा गोरे यांच्या १ एकर क्षेत्रातील बाजरीसह तालुक्यातील शेतकऱ्यांचे उन्हाळी कांदा, मका आदी पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. सावखेडगंगा, बाभूळगाव गंगा, वांजरगाव या भागात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.















